Tuesday, 2 October 2018

महात्मा गांधीचा शिक्षण विचार --- नयी तालीम
*********************************************
***********************************
‘आपण जगाला व देशाला देत असलेली सर्वोत्तम देणगी ’ असे महात्मा गांधींनी ज्याचे वर्णन केले त्या ‘नयी तालीम’ शिक्षणपद्धतीची गांधीजयंतीनिमित्त चर्चा करायला हवी.सर्वोदयी व अहिंसक समाजनिर्मितीसाठी नयी तालीम हे साधन आहे अशी गांधींची भूमिका होती.दुर्दैवाने शासनाने गांधीची ही शिक्षणपद्धती स्वीकारली नाही अन्यथा आज भारत एका वेगळेच राष्ट्र बनले असते.आज बेकारीचा प्रश्न गंभीर झाला आहे.कौशल्याधारीत शिक्षण मिळत नाही. गरिबांविषयीची कणव वेगाने हरवते आहे अशावेळी गांधीच्या शिक्षणपद्धतीची तीव्रतेने आठवण येते .
.दक्षिण आफ्रिकेत असताना गांधींनी तेथील आश्रमात असणार्या मुलांच्या शिक्षणासाठी ही पद्धती वापरली होती. त्यातून त्यांचे चिंतन विकसित झाले. १९३७ साली कॉंग्रेस सरकारे स्थापन झाल्यावर वर्धा येथे शिक्षण समेलनात गांधींनी बुनियादी शिक्षणाची अत्यंत सविस्तर मांडणी केली. विदेशात उच्च पदवी घेतलेले व रविंद्रनाथ टागोरांसोबत काम केलेले आर्यनायकम पती पत्नींनी शाळेची जबाबदारी घेतली . त्यानुसार वर्धा व भारतात बिहार,ओरिसा,आंध
्र,तामिळनाडू काश्मीर अनेक राज्यात शाळा सुरू झाल्या.१९५६ साली २९ राज्यात ४८००० नयी तालीम पद्धतीच्या शाळा होत्या आणि त्यात ५० लाख मुले शिकत होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर गांधींच्या शिक्षणविचाराचा प्रसार झाला होता. परंतु शासनाने हा शिक्षणविचार आधार मानून शिक्षण रचना न केल्याने या शाळा बंद पडत गेल्या व आज केवळ भारतात केवळ ५०० शाळा सुरू आहेत.
गांधींनी ‘नयी तालीम’ची प्रमुख ४ तत्वे मांडली. १)प्राथमिक शिक्षण हे ७ ते १४ वयोगटाचे असेल २)शिकविण्यासाठी निवडलेला हस्तोद्योग हा परिसरातील लोकांच्या मुख्य व्यवसायातील असावा ३)सर्व विषयांचे शिक्षण निवडलेल्या हस्तोद्योगाशी अनुबंध साधून दिले जावे ४) असे दिले जाणारे शिक्षण उत्पादक व स्वावलंबी असावे.याबरोबरच शिक्षण हे मातृभाषेतून दिले जावे अशी आग्रही मांडणी त्यांनी केली. शाळेत इतिहास,भूगोल,गणित,भाषा,चित्रकल
ा,संगीत,स्वास्थ,समाजशास्त्र हे विषय होते पण हे सर्व विषय उद्योगांच्या आधारे शिकवले जात.चित्रकला,सं
गीत व लोकनृत्य हे ही विषय होते. प्राथमिक शिक्षणात सफाई, आरोग्य व आहारशास्त्र यांचा समावेश त्यांनी केला. सफाईकडे गांधी जीवनाकडे बघण्याची सौदर्यदृष्टी निर्माण करणारी कृती अशा नजरेने बघत.सफाई करताना मुलांच्या मनात अशी कामे करणार्याविषयी तिरस्काराची भावना न निर्माण होता समान भाव निर्माण होईल. त्याचप्रमाणे आहारशास्त्रानेही स्वयंपाक केवळ महिलांचे काम वाटणार नाही. त्यातील विज्ञानही नकळत मुलांना कळेल.नयी तालीम म्हणजे मुलांना व्यवसायशिक्षण इतका संकुचित अर्थ नाही तर त्या उद्योगाच्या माध्यमातून गांधींना शिक्षण द्यावे असे अपेक्षित होते.वस्त्रोद्योग शिकवताना टकळी,धागा यातील भूमिती,कापसाच्या निर्मितीतील विज्ञान,वस्त्रन
िर्मितीतील अर्थकारणातील अर्थशास्त्र व गणित,वस्त्र निर्माण करणार्या गरिबांच्या जीवनाचा परिचय करून देणारा भूगोल असे अनेक विषय शिकवावेत असे गांधींना अपेक्षित होते. या शिक्षणातून उच्च नीच भाव नसलेला,शहर व खेडी नसलेला बुद्धीचे काम व श्रमाचे काम यात फारकत न करणारा समाज निर्माण होईल अशी गांधींची दृष्टी होती. इतिहास,भूगोल,ना
गरिक्षास्त्र या विषयाचा मुलांच्या वास्तवाशी संबंध जोडला गेला पाहिजे असा बापूंचा आग्रह होता.
शिक्षणतज्ञ कृष्णकुमार म्हणतात “भारतीय समाजातील द्बलेल्या समाजघटकांनी विकसित केलेल्या आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या ज्ञानव्यवस्थांन
ा शिक्षणात महत्वाचे स्थान देण्याचा प्रयत्न गांधी करत होते” शिक्षक प्रशिक्षणावर ही त्यांचा भर होता. शिक्षक व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास व्हावा म्हणून प्रशिक्षणात संगीत,क्ला,सणउत्सव यांचा समावेश असावा असे ते म्हणत.
आज जेनेटिक सायन्स व मेंदूआधारित शिक्षणातून हे सिद्ध होते आहे की अंनुभवातून दिल्या जाणार्या शिक्षणातून मेंदूचा विकास अधिक चांगला होतो व सर्वांगिण शिक्षण दिले जाते.गांधींनी ही मांडणी हे संशोधन झालेले नसताना ८० वर्षापूर्वी केली होती हे त्यांचे द्रष्टेपण होते.
आजही शिक्षणाचे स्वरूप गरीब- श्रीमंत यांच्यात भेद अधिकाधिक वाढवणारे, समान शिक्षण नाकारणारे, शिक्षणाचा व्यापार वाढविणारे असेच आहे. पुस्तकी शिक्षणावर भर, वाढणारी व्यक्तीकेंद्रीतता, वाढती उपभोगप्रधानता व त्यातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय प्रश्न, श्रमाकडे व श्रमकर्त्याकडे बघण्याची अधिक तीव्र झालेली नकारात्मक दृष्टी हे बघता नई तालिम शिक्षणपद्धती हेच उत्तर वाटते. ग्लोबल वॉर्मिंग च्या पार्श्वभूमीवर विकासाच्या धारणेबाबत आपणां सर्वांनाच पुनर्विचार करणे आवश्यक असेल. गांधीजीनी मांडलेला पर्यावरणस्नेही शिक्षणविचार म्हणून अधिकच प्रासंगिक झालेला दिसतो.
या शिक्षणातून परिसराशी जुळून घेणारा माणूस निर्माण झाला असता. आजचे शहरी ग्रामीण दुभंगलेपण आले नसते.आज बौद्धिक काम करणारा श्रेष्ठ आणि कष्ट करणारा कमी दर्जाचा व त्याआधारे दिला जाणारा पगार अशी भांजणी झाली आहे ती यातून कमी झाली असती.नव्या शैक्षणिक धोरणात नयी तालिम स्वीकारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
नयी तालिम ची पुन्हा सुरुवात ------आनंदनिकेतन
वर्धा येथील आश्रमात नयी तालिम ची शाळा १९७० च्या दशकात जिथे बंद पडली तिथेच नयी तालिम शाळा २००५ पासून पुन्हा सुरू करण्यात आली. सर्वोदयी अभ्यासक कार्यकर्त्या सुषमा शर्मा या संचालक आहेत. विद्यार्थी संख्या २४० आहे.सर्व सामाजिक गटांचे योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व आहे की नाही याकडे लक्ष असते.
प्रिती, मुक्ती आणि अभिव्यक्ती. विद्यालयातील शिक्षक-विद्यार्थी संबंधांचा हे आधार आहेत. इयत्ता सातवीपर्यंत बागकाम व शेती, स्वयंपाक, वस्त्रकला या सारख्या कामांचा समावेश आम्ही केला आहे भाषा, विज्ञान, गणित, भूगोल, सामाजिक शास्त्रेया सारख्या विषयांच्या अध्ययनासह मुले वस्त्र विणतात. कला,संगीत यावर विशेष भर आहे. सामाजिक विषयांवर सतत बोलले जाते व समाजदर्शनाच्या क्षेत्रभेटी केल्या जातात. इयत्ता सातवीपर्यंत विविध भाज्या व कापूस, मूग, तुरी, बाजरी, ज्वारी, मका यांचा पावसाळी लागवडीचा तर व मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू या सारख्या हिवाळी भाज्यांची लागवड करायला व देखभाल करायला शिकतात. हे काम करीत असताना जमिनीचे मोजमाप क्षेत्रफळ व परिमिती काढणे, बागेचा नकाशा स्केलनुसार काढणे, जमिनीवर भौमितिक आकृत्यांचा उपयोग करीत बागेची रचना करणेइ. गोष्टी मुले शिकली. विविध ऋतुंमधील किमान-कमाल तापमान, आर्द्रता, विहिरीतील पाण्याची पातळी यांचे मोजमाप, नोंदी ठेवणे, आलेख काढणे हे सहज शिकता येते . गांडूळ खत तयार करणे, कंपोस्टखत तयार करणे, द्रवरूप झटपट खत करणे, कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय अर्क तयार करून फवारणी करणे, मित्र कीड, नुकसान करणाऱ्या किडींची तोंडओळख होणे, मधमाशा व कीटकांचे निसर्गातील महत्त्वाचे स्थान समजून घेणे, अहिंसक पद्धतीने मध काढण्याच्या पद्धतींचा परिचय होणे,अळीम्बीची शेती करायला शिकली. महिन्यातून एकदा स्वयंपाकगृहात काम करण्याची प्रत्येक मुलास संधी मिळते ज्यातून पाकशास्त्र, आहारशास्त्र व स्वच्छतेचे शास्त्र धडे घेत असतानाच स्वावलंबन व लिंगसमभावाचे मह्त्त्व रुजण्यास अनुकूल वातावरण बनवणे शक्य होते. आज शिक्षणशास्त्रात ज्ञानरचनावादात ज्यात शिकविण्यापेक्षा शिकण्याची प्रक्रिया जास्त प्रभावी व टिकावू मानलेली आहे नयी तालीम ज्ञानरचनावादाशी जवळीक साधणारी, विद्यार्थ्याचा सक्रीय सहभाग घेत, जीवनकौशल्ये विकसित करीत त्यांचा आत्मविश्वास वाढविणारी आहे.शिक्षकांनी पालकांनी ही शाळा बघायला हवी
---------------------------------------------------------------------------
-----
नयी तालिम शाळेचे विद्यार्थी डॉक्टर अभय बंग
डॉक्टर अभय बंग हे सेवाग्राम आश्रमात असलेल्या नय तालीमचे विद्यार्थी होते. त्यांच्याकडून ही पद्धती समजून घेतली . ते म्हणाले की शेतकरी मजूर कसे जगतात याचा विद्यार्थीदशेत अनुभव देणारी ही पद्धती होती.दिवसभरात ३ तास उत्पादक काम करणे सक्तीचे होते. सुतकताई,विणकाम,गोशाळेची स्वस्छता,शौचालय सफाई,स्वयंपाकगृहात काम,भांडी घासणे ही कामे प्रत्येक करत होता.आश्रमात आलेल्या परदेशी पाहुण्याची मुले मुलाखत घेत. स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास खुद्द स्वातंत्रसैनिक येवून समजून देत. आकाशातले तारे दाखविले जात तर कधी झाडावर चढून कवितेचे पुस्तक आम्ही वाचत होतो. कालपेक्षा तू आज पुढे सरकलास का ? असा महात्मा गांधींचा दृष्टीकोन परीक्षेत होता. प्रात्याक्षिक परीक्षेत ‘स्वयंपाक करून दाखव’ ‘हा वाफा दिला तर त्यात नियोजन कसे कराल?’ असे प्रश्न विचारत..स्वयंपाकात भांडी घासण्यापर्यंत कामे करावी लागायची.. जीवशास्त्राचे शिक्षक आम्हाला परिसरात फिरायला नेत व झाडांविषयी प्रश्न विचारत व त्यावरून विद्यार्थ्यांचे आकलन तपासत...
टॉलस्टॉय च्या इव्हान द फूल या कथेत एक आंधळी म्हातारी ज्यांच्या हातावर कष्ट करून घट्टे पडले नाहीत त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवते .मला वाटते ही मूल्यव्यवस्था शिक्षणात आणायला हवी.’नयी तालीम’ला केवळ व्यावसायिक शिक्षण म्हणणे मला योग्य वाटत नाही कारण शाळेत मी केवळ शेती शिकलो नाही तर शेतकर्याचा सन्मान करायला शिकलो .त्यामुळे ती जीवनदृष्टी आहे.
---------------------------------------------------------------------------
---
नयी तालिम कडे आकर्षण वाढते आहे --- डॉक्टर सुगन बरंठ
देशभरात वेगवेगळ्या राज्यात आज पर्यावरणपूरक व स्पर्धाविहीन शाळा वाढत आहेत. या शाळा नयी तालिम चा दृष्टीकोन स्वीकारत आहेत. शिक्षणात श्रमाला महत्व,परिसराशी शिक्षण जोडणे,मानवी मूल्यांना प्रतिष्ठा हे अभ्यासक्रमात प्रतिबिंबित होते आहे असे नयी तालिमसमिति चे राष्ट्रीय अध्यक्ष सुगन बरंठ यांनी सांगितले.याकडे आम्ही एक शाळा म्हणून बघत नसून सर्वोदयी समाजरचना निर्मितीचे साधन म्हणून ही समिति बघते. समिति ची
http://www.naitalimsamiti.org/ वेबसाइट असून http://
www.lokbharti.org व http://puvidham.in/puvidham-learning-centre/ अशा काही शाळा या विचारावर प्रभावी काम करीत आहेत
-----------------------------------------------------------------
नयी तालिम संकल्पनेवर अनेक पुस्तके हिन्दी इंग्रजीत उपलब्ध आहे. शिक्षणतज्ञ रमेश पानसे यांनी वर्धा येथे राहून नयी तालिम:गांधीप्रणित शिक्षणविषयक प्रयोगांचा इतिहास” (डायमंड प्रकाशन) हे ३५० पानांचे पुस्तक या विषयावर मराठीतील महत्वाचे पुस्तक अभ्यासकांना उपयुक्त आहे

1 comment:

  1. titanium coating - The TITanium Stone
    This is your classic ceramic coated iron microtouch titanium trim as seen on tv bar and trekz titanium this is the exact exact babyliss pro nano titanium straightener product. The titanium coating has a silver lining, which titanium teeth dog holds a coating which titanium necklace mens is

    ReplyDelete